अलिबाग व पेण तालुक्यातील वाढीव धानखरेदी केंद्रावर भात खरेदी होणार लवकरच सुरु
अलिबाग / जिमाका
आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंर्गत दि.महाराष्ट्र स्टेट को ऑप मार्केटींग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेली अभिकर्ता संस्था जिल्हा पणन अधिकारी रायगड यांच्यामार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2020-21 मध्ये जिल्हयातील अलिबाग व पेण तालुक्यातील 04 वाढीव धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यापूर्वी जिल्हयात पणन हंगाम 2020-21 मधील धान खरेदी करिता 36 खरेदी केद्रांना मंजूरी दिली असून त्या खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु आहे.
या भात खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगाम दि. 01 ऑक्टोबर 2020 ते दि.31 मार्च 2021, रब्बी पणन हंगाम दि. 01 मे 2021 ते दि.30 जून 2021 हा आहे.
भात खरेदीवेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतच्या 7/12 उताऱ्याची व गाव नमुना 8 (अ) ची छायांकित प्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरीता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचे 7/12 उताऱ्यानुसार पिकाखालील क्षेत्र, या वर्षाची पीक परिस्थिती (पैसेवारी), पिकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन, धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल.
ही खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरीता खरेदी केंद्रावर भात विक्रीकरीता आणताना प्रत्येक शेतकऱ्याने सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुकाची छायांकित प्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान/भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबधित शेतकऱ्यांचीच राहील.
धानाच्या आधारभूत किंमती- भात सर्वसाधारण- आधारभूत किंमती रुपये प्रति क्विंटल- रुपये 1 हजार 868, शेतकऱ्यांना अदा करण्याची रक्कम प्रति क्विंटल- रुपये 1 हजार 868, भात अ दर्जा- आधारभूत किंमती रुपये प्रति क्विंटल- रुपये 1 हजार 888, शेतकऱ्यांना अदा करण्याची रक्कम प्रति क्विंटल- रुपये 1 हजार 888.
पणन हंगाम 2020-21 मध्ये खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विटल रु.700/- प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. ही प्रोत्साहनपर राशी प्रति शेतकरी 50 क्विंटलची मर्यादा पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहीत केलेल्या नियमात बसणारे FAQ दर्जाचेच धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. केंद्र शासनाने हंगाम 2020-2021 करिता धानासाठी आद्रतेचे अधिकतम प्रमाण 17 टक्के विहीत केले आहे. या प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त आढळल्यास भाताची खरेदी करण्यात येणार नाही. भात खरेदी करताना ओलावा व आर्द्रतेचे प्रमाण 17 टक्के असल्याची खात्री करुनच धान/भरडधान्याची खरेदी करण्यात येईल.. कोणत्याही परिस्थितीत जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त धान/भरडधान्य खरेदी केले जाणार नाही. विहीत प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असलेले धान/भरडधान्य खरेदी केल्यास अभिकर्ता संस्थांनी वेळीच संबधितांवर दंडात्मक कारवाई करावी. भरडधान्य स्वच्छ व कोरडे असून ते विक्री योग्य (मार्केटेबल ) असल्याची अभिकर्त्यांनी खातरजमा केल्यावरच भाताची खरेदी करण्यात येईल. मात्र भात आद्रतेच्या विहित प्रमाणात असल्याची खात्री करुन ते स्विकारल्यानंतर आद्रता कटाती लावण्यात येणार नाही. खरेदी केंद्रावर शासनाने निर्धारित केलेल्या धानाच्या आधारभूत खरेदी किंमतीबद्दल दर फलक लावण्यात यावा. तसेच शासनाने मंजूर केलेल्या प्रोत्साहनपर राशीबाबत दर फलकावर नमूद करावा. आधारभूत किंमत योजनेंतर्गत असलेल्या धानाचा दर्जा, विनिर्देश, खरेदी केंद्रे तसेच एफ.ए.क्यू.दर्जाची मानके इत्यादीबाबत माहिती मराठीतूनच फलकावर दर्शविण्यात यावीत. तसेच खरेदी केंद्र व त्यास जोडण्यात आलेल्या गावांची नावे याची प्रसिध्दी प्रत्येक धान खरेदी केंद्रावर अभिकर्ता संस्थांनी देण्यात यावी.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या धानाच्या किंमती, दर्जा, खरेदी केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यात आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागावर प्रसिद्ध कराव्यात. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेल्या नव्या धान/भरडधान्याची खरेदी करण्यात येईल. खरेदी केलेल्या धान/भरडधान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्याबाबत तसेच ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान/भरडधान्य खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील 7 दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, अशा शासनाच्या सूचना आहेत.
खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी, रायगड-अलिबाग , संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी पंचायत समिती तसेच उप अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सह.संस्था, खरेदी विक्री संघ, सह.भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध आहे.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, रायगड यांच्याकडील पणन हंगाम 2020-2021 करिता नवीन मंजूर धान खरेदी केंद्र
अलिबाग तालुका- सबएजंट संस्थेचे नाव, किहीम विभाग सहकारी भात गिरणी लि.चोंढी, ता. अलिबाग,खरेदी केंद्र-चोंढी. दत्तकृपा भाजीपाला सह.संस्था मर्या.रेवदंडा, मु.पो.रेवदंडा, खरेदी केंद्र रेवदंडा व बोर्लीमांडला
पेण तालुका-सबएजंट संस्थेचे नाव, मे.जय जलाराम राईस मिल, मु.पो.वरसई, ता.पेण प्रोपा.श्री.मनोहरलाल शंकरलाल शहा, खरेदी केंद्र-वरसई.
===========
जाहिरात
============