वासांबे जिल्हा परिषद विभागात उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती जाहीर

वासांबे जिल्हा परिषद विभागात उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती जाहीर.

कुलाबा प्रभात वृत्तसेवा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका जाहीर झाल्या असून वासांबे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणत्या गटाची कोणत्या पक्षाशी युती जुळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना वासांबेत उध्दव ठाकरे शिवसेना कोणासोबत असणार याच चर्चा वासांबे मोहोपाडा परिसरात सुरू होत्या.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्याचा शुक्रवार हा दुसरा दिवस असतानाही चित्र स्पष्ट झाले नव्हते.वासांबे जिल्हा परिषद मतदार संघात अनेक तर्क वितर्क लावले जात होते.

    अखेर शुक्रवार दि.16 जानेवारी रोजी सायंकाळी उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत,तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे,तालुका संपर्क प्रमुख उमेश गावंड यांच्या उपस्थितीत मोहोपाडा शिवसेना शाखेत बैठक होवून वासांबे जिल्हा परिषद गटात उध्दव ठाकरे शिवसेना गटाची राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती झाल्याचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी जाहीर केले.या निर्णयाचे शिवसैनिकांनी स्वागत करुन टाळ्यांचा कडकडाट केला.

वासांबे जिल्हा परिषद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने युतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी सरपंच संदीप सुदाम मुंढे  अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झाले असून वासांबे पंचायत समिती गटातून उध्दव ठाकरे शिवसेनेचे रोशन बाळाराम राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

तर रिस पंचायत समिती गणासाठी लवकरच उमेदवार जाहीर होईल.

---------