सुधागड तालुक्यातील बल्लाळेश्वर नाविन्यपूर्ण सर्व सेवा सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्रावर होणार धान खरेदी !
अलिबाग / जिमाका
आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटिंग रायगड यांच्यामार्फत खरीप व रब्बी हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील बल्लाळेश्वर नाविन्यपूर्ण सर्व सेवा सहकारी संस्था, पाली यांच्यामार्फत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू करण्यात येणार आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे भात खरेदीचा कालावधी खरीप हंगाम दि. 1 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च2021, रब्बी हंगाम दि. 1 मे 2021 ते 30 जून 2021 हा आहे.
भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनी बाबतचा सातबाराचा उताऱ्याची व गाव नमुना 8 अ ची छायाप्रत खरेदी केंद्रावर धान्य विक्रीकरिता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धान्य क्षेत्र पाहून भरड धान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यानुसार पिकाखालील क्षेत्र, यावर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी), पिकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन धान भरड धान्य खरेदी करण्यात येईल. या धानाची खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरिता खरेदी केंद्रावर भात विक्रीकरिता आणताना प्रत्येक शेतकऱ्यांनी सोबत आपल्या आधारकार्डची तसेच बँकेच्या पासबुकची छायाप्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले परंतु खरेदी न झालेले धान भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची राहील.
तसेच शासन निर्णय दि. 21 डिसेंबर 2020 अन्वये पणन हंगाम 2020-21 मध्ये खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराव्यतिरिक्त धान उत्पादक क्षेत्र शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 700/- प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. ही प्रोत्साहनपर राशी प्रति शेतकरी 50 क्विंटल ची मर्यादा पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या एफएक्यू दर्जाचे धान्य भरड धान्य खरेदी करण्यात येईल.
केंद्र शासनाने हंगाम 2020-21 करिता आद्रतेचे प्रमाण धानासाठी 17 टक्के विहित केले आहे. या प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त आढळल्यास भाताची खरेदी करण्यात येणार नाही. भात खरेदी करताना ओलावा व आर्द्रतेचे प्रमाण 17 टक्के असल्याची खात्री करूनच धान भरड धान्याची खरेदी करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत जास्त ओलसर किंवा बुरशी युक्त धान्य भरड धान्य खरेदी करू नये. विहित प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असलेले धान्य भरड धान्य खरेदी केल्यास अभिकर्ता संस्थांकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. भरड धान्य स्वच्छ व कोरडे असून ते विक्री योग्य मार्केटेबल असल्याची अभिकर्त्यांनी खातरजमा केल्यावरच भाताची खरेदी करण्यात येईल. मात्र भात आर्द्रतेच्या विहित प्रमाणात असल्याची खात्री करून ते स्वीकारल्यानंतर आर्द्रता कटाती लावण्यात येणार नाही. धान्य खरेदी करताना स्वच्छ, कोरडे असावे.
खरेदी केंद्रावर फक्त खरेदी किंमतीबद्दल दरफलक न लावता आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत असलेल्या धानाचा दर्जा, विनिर्देश, खरेदी केंद्र तसेच एफएक्यू दर्जाचे मानके इत्यादी बाबतची माहिती मराठीतूनच फलकावर दर्शविण्यात यावी. खरेदी केंद्र व त्यास जोडण्यात आलेल्या गावांच्या नावांची प्रसिद्धी प्रत्येक धान खरेदी केंद्रावर अभिकर्ता संस्थांनी द्यावी. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या धान्याच्या किंमती, दर्जा, खरेदी केंद्र व खरेदी केंद्रात जोडण्यात आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी प्रदर्शित करावेत तसेच त्यांच्या नोटीस बोर्डावर दर्शनी भागात प्रसिद्ध करावेत.
केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवे धान /भरड धान्याची खरेदी करण्यात येईल. खरेदी केलेल्या धान /भरड धान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान/भरड धान्य खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील सात दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, अशा शासनाच्या सूचना आहेत. भात खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी, तसेच उप अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ, सहकारी भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध राहील.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडील पणन हंगाम 2020-21 करिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या स्वाक्षरीने सुधागड तालुक्यातील पाली येथील बल्लाळेश्वर नाविन्यपूर्ण सर्व सेवा सहकारी संस्था मर्या.पाली, पाली (कासारआळी) हे धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
==================
जाहिरात
==================
अमर इलेव्हन कासप
==================
कुलाबा प्रभात मार्गदर्शक - राकेश खराडे
कुलाबा प्रभात संपादक - अमोल सांगळे
कुलाबा प्रभात उपसंपादक - वैभव पाटील