हरिनामाच्या गर्जनेत लोधिवली दुमदुमणार !

 हरिनामाच्या गर्जनेत लोधिवली दुमदुमणार !

भक्ती, नामस्मरण आणि वारकरी परंपरेचा दिव्य सोहळा - अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण.



कुलाबा प्रभात वृत्तसेवा 

लोधिवली नगरी पुन्हा एकदा हरिनामाच्या अखंड निनादाने दुमदुमणार आहे. हनुमान व विठ्ठल–रखुमाई मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अखंड हरिनाम उत्सव” आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, तो श्रद्धा, संस्कार आणि सामुदायिक ऐक्याचा दिव्य उत्सव ठरणार आहे.

या भक्तिमय पर्वात दररोज पहाटे काकड आरतीने वातावरण प्रसन्न होईल. त्यानंतर हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, ओजस्वी प्रवचने, सुरेल भजने, जोशपूर्ण कीर्तन आणि हरिजागर यांची अखंड मालिकाच रंगणार आहे. संपूर्ण परिसर नामस्मरणाच्या तेजाने उजळून निघणार असून भाविकांना आत्मशुद्धी व अंतर्मुख होण्याची संधी लाभणार आहे.

या सोहळ्यासाठी मान्यवर कीर्तनकार ह.भ.प. सच्चिदानंद महाराज कांबेकर (कांबे), संदिप महाराज यादव (आसरेवाडी), प्रविण महाराज फराट (इंजिवली) तसेच प्रवचनकार ह.भ.प. बाळाराम महाराज कुरंगाळे (कांबे), धर्मा महाराज भोईर (लोधिवली) आणि दत्ता महाराज शिंदे (कोपरी), जागर भजन हनुमान प्रासादिक भजन मंडळ कालणवाडी,हनुमान प्रासादिक भजन मंडळ टेंभरी,हनुमान प्रासादिक भजन मंडळ कुंभिवली  यांची प्रभावी उपस्थिती लाभणार आहे.

त्यांच्या वाणीतील अध्यात्मिक ओज भाविकांच्या अंत:करणाला स्पर्श करून नामभक्तीचा संदेश अधिक दृढ करेल.


मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हरिनामाच्या अखंड गजरात नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार असून टाळ-मृदुंगाच्या निनादात वारकरी परंपरेचा जिवंत अनुभव भाविकांना घेता येणार आहे.

तसेच दि. २५ फेब्रुवारी २०२६, सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत (भारत गौरव, महाराष्ट्र भूषण, रायगड मित्र पुरस्कार सन्मानित) ह.भ.प. दिलीप महाराज राणे यांचे सुश्राव्य हरिकीर्तन रंगणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हरिनामाच्या अखंड गजरात न्हाऊन निघणारा हा भक्तीचा महासागर लोधिवलीसाठी एक अद्वितीय अध्यात्मिक पर्व ठरणार आहे.

“नाम घेतल्यानेच जीवन धन्य होते” - या भावनेतून सर्व भाविकांनी कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मोन्नती विश्वशांती वारकरी ग्रामस्थ मंडळ, लोधिवली, लोधिवलीवाडी व लोधिवली सोसायटी यांच्या तीने करण्यात आले आहे.

---------