पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा.


पनवेल / प्रतिनिधी

 तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक गुरुवारी आयोजित केली होती. या बैठकीत आमदार ठाकूर यांनी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला. 

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत त्यांनी एमजेपी, एमआयडीसी आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. जर ग्रामीण भागातील जनतेला पुरेसे पाणी मिळत नसेल, तरं या संदर्भात मोठे आंदोलन उभे केले जाईल, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, लवकरच ग्रामविकास मंत्र्यांकडे याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 



तसेच अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पाठपुरावा करण्याची सूचना केली. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्यासह पनवेल पंचायत समितीचे पदाधिकारी, एमजेपी आणि एमआयडीसीचे अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.

---------