ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांच्या अपघाती निधनाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

 ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांच्या अपघाती निधनाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन


रसायनी / राकेश खराडे

ज्येष्ठ पत्रकार व वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांचा पाली खोपोली मार्गावर तुकसई गावाजवळ मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. हा अपघात व मृत्यू संशयास्पद असल्यामुळे त्याचा सखोल तपास व चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की मंगेश वाघमारे हे भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तसेच जेष्ठ पत्रकार आणि पुरोगामी चळवळीतील नेते होते. त्यांच्या अपघाताचे कोणतेही धागेदोरे किंवा पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. केवळ त्यांची अपघाती मोटरसायकल व मृत शरीर घटनास्थळी मिळाले अपघात केलेले वाहन किंवा त्या वाहनाचे कोणतेही भाग घटनास्थळी नव्हते.

त्यामुळे या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला जात असून हा अपघात नसून घातपात आहे असे देखील बोलले जात आहे. परिणामी अशा संशयास्पद मृत्यूची पोलिसांनी सखोल चौकशी करावी योग्य प्रकारे तपास करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आला आहे.

तसेच सध्या सुरू असलेल्या तपासात दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप देखील वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आला आहे.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, महासचिव वैभव केदारी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड व प्रकाश गायकवाड आणि सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-----------