गुणवत्तेच्या शिखरावर खारेपाटणचा अभिमान !
SQAAF बाह्य मूल्यांकनात A+ श्रेणी; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळेचा ऐतिहासिक मान.
खारेपाटण / गुरुनाथ तिरपणकर
ज्ञान, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांची साक्ष देत शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण या प्रशालेला शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात A+ श्रेणी प्राप्त झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा म्हणून हा बहुमान मिळाल्याने खारेपाटण पंचक्रोशीचा शैक्षणिक अभिमान उंचावला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शाळा मानक प्राधिकरण (SQAAF) कक्षामार्फत हे मूल्यांकन पार पडले. सन २०२४-२५ मध्ये राज्यातील तब्बल १,०२,६७५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले होते. त्यापैकी २०२५-२६ मध्ये १०,६४४ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली. त्रयस्थ पक्षाद्वारे (Third Party Assessment) अंतिम छाननीनंतर ४२९ शाळांना A+ श्रेणी बहाल करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव मानकरी म्हणून शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांची निवड झाली आहे.
या यशाबद्दल डॉ. हेमंत वसेकर (भा.प्र.से.), संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन करत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
विशेष परिश्रमांची दखल
या ऐतिहासिक यशामागे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, माजी विद्यार्थी समन्वयक कु. गौरी सारंगे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग यांचे सातत्यपूर्ण व समर्पित योगदान आहे. कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक वेळ देत त्यांनी ऑनलाइन SQAAF कामकाज नियत वेळेत पूर्ण केले.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. रघुनाथ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, विश्वस्त मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विद्यार्थी व पालक यांनी सर्वांचे अभिनंदन करून या यशाचा आनंद साजरा केला आहे.
शैक्षणिक ओळख अधिक दृढ
या उल्लेखनीय यशामुळे शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम झाली असून संपूर्ण जिल्ह्यातून प्रशालेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गुणवत्तेचा हा मान केवळ शाळेचा नाही, तर खारेपाटणच्या प्रत्येक नागरिकाच्या अभिमानाचा क्षण ठरला आहे.
---------
